Monday 2 January 2023

प्रेमाचा केमिकल लोचा

प्रेम म्हणजे काय असते?


प्रेमाचे (शरीर) शास्त्र

“व्हँलेंटाइन डे” जवळ येतोय. संस्कृतीरक्षकांच्या पोटात दुखायची वेळ झाली. पाडगावकर म्हणतातच…

आम्ही डॉक्टर लोकं जरा अरसिक असतो. लोकांना जिथे गालावरचे गुलाब दिसतात तिथे आम्हाला रक्तवाहिन्यांचे अभिसरण दिसते, प्रेमीजनांना जेव्हा ‘हृदयी वसंत फुलताना …’ असे काही सुचत असते तेव्हा आम्हाला ‘हृद्य म्हणजे शरीराला रक्त पुरवणारा फक्त पंप असतो, भावना , विचार हा मेंदूचा प्रांत आहे, हृदयाचा नाही’ हे विज्ञान आठवत असते, एखादा तरुण ‘उरात होतेय धडधड, लाली गालावर आली’ हे उत्साहात गुणगुणत असेल तर हे एखाद्या आजाराचे लक्षण तर नाहीना ? असा प्रश्न आम्हाला पडतो.

आठवतं ना?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती!
लाटांवर बेभान होऊन 
नाचलो होतो,
होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो...

तेव्हा ‘माणूस प्रेमात पडतो म्हणजे नक्की काय होते ?’ यामागचे काव्य समजून घेण्याला आम्ही अगदी आयोग्य असलो तरी यामागचे शरीरशास्त्र समजून घेणेही गमतीदार ठरेल.

एखादा पुरुष किंवा स्त्री जेव्हा प्रेमात पडते तेव्हा त्याला त्याच्या प्रिय व्यक्ती विषयी तीव्र आकर्षण वाटते. सतत तिचा विचार मनात येत राहतो, तिला भेटावे, तिच्याशी बोलावे असे तीव्रतेने वाटत राहते. प्रेम आंधळे असते असे म्हणतात, म्हणजे श्रीमंत माणूस गरीब व्यक्तीच्या प्रेमात पडू शकतो, सुंदर स्त्री कुरूप पुरुषावर भाळू शकते, जात पात, देश, धर्म कसलाही अडथळा प्रेमात पडण्याला येत नाही. आजूबाजूच्या लोकांना यामागचे लॉजिक काही कळत नाही. काय पहिले याने हिच्यात/ हिने याच्यात असा प्रश्न पडतो. म्हणून तर म्हणतात, ‘लैलाचे सौंदर्य बघायचे तर नजर मजनूची हवी ?’

थोडक्यात प्रेम म्हणजे एक गुंतागुंतीची बरीचशी अनाकलनीय भावना असते. प्रेम या भावनेला उत्क्रांतीत अतिशय महत्व आहे. पशु पक्षीही जोडीदार निवडताना काही निकष पाळतात. सुगरण उत्तम विणकाम करणाऱ्या नराची निवड करते, लांडोर मोराच्या नृत्यावर भाळते, वाघीण तगड्या ताकदवान नराला प्राधान्य देते, नर मादी एकमेकांचे गंध दुरूनच ओळखतात. ‘हा नर आपल्याला, आपल्या बाळाला, संरक्षण; अन्न पाणी पुरवू शकेल का ? उत्तम बीज देवू शकेल काय ?’ हा विचार मादी करते तर ‘ही मादी जननक्षम आहे का ?’ ही गोष्ट नर जोखतात.

माणूस प्रेमात पडताना अशी काही अंतःप्रेरणा असते का ? ‘ आमच्या प्रेमात शारीरिक आकर्षणाचा अंशही नाही, आमचे प्रेम अगदी निर्मल आहे.’ असे पुन्हा पुन्हा सांगणार्या प्रेमवीरांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे ?

माणूस जन्मतः उतःशृंखल असतो. स्वातंत्र्यप्रिय असतो. त्याला बंधनात राहणे आवडत नाही. अशा अनिर्बंध प्राण्याला अडकवण्यासाठी निसर्गाने तयार केलेला एक सापळा म्हणजे प्रेम. याच भावनेमुळे स्त्री पुरुषाला आणि पुरुष स्त्रीला एकमेकांत अडकवून ठेवू शकतात. ज्यामुळे आपत्य संगोपण सुसह्य होते आणि मानवजात टिकून राहते.

प्रेमाच्या तीन पायऱ्या असतात. १) वासना २) आकर्षण ३) बांधिलकी. व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे एकच नियम सर्वांना लावता येणार नाही. अनेकदा या तीनही पायऱ्या एकाच वेळेस अस्तित्वात असतात किंवा क्रमाक्रमाने दिसून येतात. काही माणसे ९० सेकंद इतक्या कमी वेळातही प्रेमात पडतात. तुम्ही प्रथमदर्शनी प्रेमाबद्दल ऐकले आहे ना ? “मेघ नसता, वीज नसता, मोर नाचू लागले ….! जाहले इतकेच होते की तुला मी पहिले …!!” असे होते खरे काहींच्या बाबतीत. काही मात्र दीर्घ सहवासाने एकमेकांचे गुणदोष समजावून घेऊन टप्प्या टप्प्याने प्रेमात विरघळून जातात. यापैकी कुठले प्रेम खरे आणि टिकवू असते ? प्रथमदर्शनी प्रेमाला द्वितीय दर्शन हा उतारा आहे असे म्हणतात. मात्र हे नेहमीच खरे नसते. बघताक्षणी प्रेमात पडलेली जोडपी एकमेकांचे खरे रूप समजल्यावर भानावर येतात अशी उदाहरणे दिसतात तशी आयुष्यभर एकमेकांना साथ देणारे लोकं ही असतात. पाच वर्षे डेटिंग करून, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहून लग्नानंतर महिन्याभरात वेगळे होणारे, ज्याला जन्माचा जोडीदार निवडला त्याला हाडवैरी समजून कोर्टकचेर्या करणारे दंपतीही कमी नसतात.

काय आहे यामागचे विज्ञान ?

  • वासना – मान्य करा अथवा करू नका पण वासना ही प्रेमाची पहिली पायरी असते. ही वासना प्रज्वलित होते ती शैरातील काही हार्मोन्स मुळे. इस्ट्रोजेन आणि टेस्टेस्टेरॉन हे प्रमुख पुनरुत्पादन संबंधी हार्मोन्स वासना प्रज्वलित करण्याचे काम करतात. या हार्मोन्सच्या प्रभावाने मेंदूतील लीम्बिक संस्था काम करू लागते. ऐश्चिक, अनैच्छीक हालचाली, कृती, भावना, स्मृती, काहीतरी करण्याची प्रेरणा आदी गोष्टी लीम्बिक संस्थेच्या आखत्यारीत येतात. लैगिक वासना, आनंद, सुख या बाबींमुळे माणूस समागमाला प्रवृत्त होतो म्हणून मानवजात टिकून राहण्यात या हार्मोन्सचा आणि लीम्बिक संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. याशिवाय आरोग्य टिकून राहण्यात आणि ताणतणावाचे नियंत्रण करण्यात ही संस्था मोलाची कामगिरी करते. मनुष्याच्या अंतर्मनात बालपणापासून अनेक प्रतिमा कैद झालेल्या असतात व त्यातील अनेक प्रतिमा लैगिक जाणिवेशी संबंधित असतात. उदाहरणार्थ फ्रॉईडच्या मते लहान मुलांत मातृप्रतिमा लैगिक जाणिवेशी निगडीत असते, त्याचप्रमाणे विशिष्ठ गंध, स्मृती, सामाजिक चालीरीती, गुणसूत्रे, वैयक्तिक आवडीनिवडीही लैगिक जाणीवेवर प्रभाव टाकतात.
  • आकर्षण – या पुढची सर्वात अवीट आणि सुंदर पायरी असते आकर्षणाची. प्रेमाची हीच खरीखुरी सुरुवात असते. प्रेमापात्राची सतत आठवण येणे, त्याशिवाय काहीही न सुचणे, तहान, भूक, झोप हरवणे आदी बाबी या टप्प्यावर येतात. ‘हा आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर कालखंड.’ असे अनेकजन सांगतील. या कालखंडावर प्रामुख्याने तीन रसायने प्रभाव टाकतात.
  • अँड्रेनँलीन – आयुष्याच्या रणांगणावर माणसाला संकटांवर मात करण्याला प्रवृत्त करणारे हे हार्मोन प्रेमाच्या युद्धात देखील कामगिरी बजावते . संकटप्रसंगी ‘लढा किंवा पळा’ ही मुलभूत प्रेरणा या हार्मोन्स मुळे मिळते. आकस्मित घटना घडली की हे हार्मोन स्रवते. उदाहरणार्थ अचानक आपल्या समोर वाघ आला तर आपण एकदम सावध होतो. त्या क्षणी आपल्या मनात असलेले इतर विचार अचानक गायब होतात. आपली सर्व उर्जा आणि बुद्धी ‘आता वाघाला कसे तोंड द्यावे ?’ या एकाच दिशेला लागते. त्याक्षणी तहान, भूक, झोप क्षणात नष्ट होते. प्रेम ही आयुष्यात अचानक घडणारी घटना असते. त्याला शरीर एखाद्या अपरिचित घटनेप्रमाणेच तोंड देते. हद्याची धडधड वाढणे, तोंडाला कोरड पडणे, पोटात गोळा येणे, प्रेयसी / प्रियकर सोडून इतर सर्व गोष्टींचा विसर पडणे हे सर्व या हार्मोन मुळे होते.
  • कॉर्टिसॉल– अँड्रेनँलीन हार्मोनच्या संगतीने सुखद स्मृती पुन्हा पुन्हा जागवण्याचे काम करते.
  • डोपामाईन – “प्रियतमेच्या डोळ्यात नशा असते” असे प्रियकराला वाटते ते काही खोटे नसते; मात्र ही नशा प्रणयनीच्या डोळ्यात नसते तर तुमच्या मेंदूत असते ! मेंदूत स्त्रवणाऱ्या डोपामाइन नावाच्या पदार्थाचा तो परिणाम असतो . याची लक्षणे कोकेन सारख्या अमली पदार्थाशी मिळती जुळती असतात. शरीरात उर्जेचा , आनंदाचा संचार होणे, दिशा काळाचे भान न राहणे हे या डोपामाइन चे प्रताप ! नुकत्याच प्रेमात पडलेल्या युगुलांचा फंक्शनल एम आर आय काढला तर स्त्री पुरुष दोघांच्या मेंदूत डोपामाइन चे वहन करणाऱ्या न्युरोट्रान्समीटर्स चे प्रमाण वाढलेले सापडते.
  • सिरोटोनिन – प्रेमातील उत्तेजित अवस्थेला कारणीभूत द्रव्य म्हणजे सिरोटोनिन. गम्मत म्हणजे याचे सती पुरुषांतील प्रमाण वेगवेगळे असते. प्रेमात पडलेल्या पुरुषात सिरोटोनिन कमी होते तर स्त्रीत वाढते. मात्र त्याचा प्रभाव दोघांवर सारखाच पडतो. प्रियतम सोडून इतर काहीही न सुचणे हीच या द्रव्याची जादू! एका अभ्यासानुसार प्रेमात पडलेले तरुण तरुणी दिवसातील ६५ % वेळ केवळ एकमेकांच्या चिंतनात घालवतात. 
  • बांधिलकी – जेव्हा एखादे जोडपे प्रेमाच्या पहिल्या बहरतील दोन पायऱ्या पार करते आणि प्रेमाच्या अधिक परिपक्व अवस्थेला पोहचते तेव्हा खर्या आठने त्यांच्या प्रीतीला पूर्णत्व प्राप्त होते. ही तिसरी पायरी म्हणजे बांधिलकीची पायरी. एकमेकांविषयी आपुलकी निर्माण होवून एकमेकांच्या आयुष्यातील सुख दुःखाशी एकरूप होण्यास लायक बनवणारी ही घटना. या बांधिलकीमुळेच जोडपी एकमेकांची जबाबदारी उचलतात, एकमेकांच्या मर्यादा आपल्या अस्तित्वाने पूर्ण करतात. याला ही दोन हार्मोन्स कारणीभूत असतात.
  • ऑक्सिटोसीन – ऑक्सिटोसीन म्हणजे मिठीचे रसायन ! याचे मुख्य काम आई आणि बाळात बंध निमण करणे. हे मुख्यता जेव्हा स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला कळा येण्यास कारणीभूत ठरते. तसेच जेव्हा ती बाळाला जन्म देते तेव्हा तिच्या स्तनातून स्तन्य पाझरण्यास सहायक होते. नुकत्याच जन्मलेल्या असहाय बाळाचे सर्व आपत्तींपासून संरक्षण करण्याची प्रेरणा आईला या हार्मोन मुळे मिळते. हिरकणीने जीव धोक्यात घालून रायगडचा उभा कडा उतरला तेव्हा तिच्या शरीरात याच हार्मोनचे वर्चस्व असावे.

आई आणि बाळात बंध निर्माण करणारे हे हार्मोन अल्लड प्रियकर आणि प्रेयसीचे परिपक्व दंपतीत रुपांतर घडवण्याचे काम करते. हे समागमाच्या अत्युच्य क्षणी स्रवते. जी जोडपी नियमित समागमाचा आनंद घेतात त्यांच्यात कालांतराने आपोआप आपुलकी, प्रेम, बांधिलकी निर्माण होते. प्रेमाच्या भाषा मूक असते असे म्हणतात. बाळाला भूक लागली आहे हे आईला अपोआप समजते. बाळाच्या स्पर्शाने, रडण्याच्या आवाजाने, कित्येकदा तर बाळ दुसर्या खोलीत असले तरी अन्तःप्रेरणेने आईला ते कळते. बाळालाही, आईने जवळ घेतले की ते आपसूक स्तनाकडे सरकते, हे स्तन आहेत , इथे दुध आहे, हे ओढायचे आहे हे त्याला कुणी शिकवत नाही! ते आपोआप लुचू लागते. त्याचप्रमाणे प्रियकर आणि प्रेयासितही असा निःशब्द संवाद होवू लागतो. आपल्या जोडीदाराला काधी काय हवे आहे ते आपोआप कळू लागते. हे बंध निर्माण होण्यास ऑक्सिटोसीन महत्वाची कामगिरी पार पाडते.

  • व्हासोप्रेसिन – हे मुख्यतः रक्तदाब नियंत्रक हार्मोन. मेंदूच्या पिट्युटरी ग्रंथीतून स्रवते. यामुळे लघवी आणि तहान कमी लागते. याचा माणसाच्या व्यक्तिमत्वावराही प्रभाव आढळून आला आहे. माणसाचे व्यक्ती व्यक्तीमधील संबंध, सामाजिक व्यवहार, इतरांच्या मागे उभे राहणे, बांधिलकी आणि सकारात्मक विचार हे याच्या प्रभावाखाली येतात.

तर असे आहे प्रेमाचे विज्ञान. मात्र तेही अपुरे आहे. प्रेम हे विज्ञानाला बरेचसे अनाकलनीय कोडेच आहे. काहीसे सुटलेले बरेचसे न सुटलेले. कितीहे समजून घेतले तरी प्रेमाचे विज्ञान प्रेमात पडल्याशिवाय समजणार नाही. इथे विद्वत्ता अपुरी पडते. हा अनुभवाचा प्रांत आहे. पुस्तके वाचून समजणार नाही.

                              पोथी पढत जग मुवा…. पंडित भया न कोई

                                              धाई अक्षर प्रेम के …पढे सो पंडित होय !!  


 

प्रेमाचा केमिकल लोचा

प्रेम म्हणजे काय असते? प्रेमाचे (शरीर) शास्त्र “व्हँलेंटाइन डे” जवळ येतोय. संस्कृतीरक्षकांच्या पोटात दुखायची वेळ झाली. पाडगावकर म्...